स्थैर्य, जुन्नर, दि. १४ : मागील वर्षभर सुरू असलेला निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनाचा कहर यामुळे अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आला आहे. महागडी औषधं, खते, फवारणी खर्च व मजुरी वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे वैतागून शेतकरी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवू लागले आहेत. आंबेगाव तालुक्यातील कळंब व लवकी परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेतील झाडांवर थेट कुऱ्हाड चालवून उभी असलेली द्राक्ष बाग आडवी केली आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे मातीमोल बाजारभावाने द्राक्ष विकण्याची वेळ आली. या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका निर्यातक्षम द्राक्ष बागांना बसला आहे. कमी-अधिक द्राक्ष असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी परिस्थिती दर वर्षी कायम राहिली तर द्राक्ष उत्पादकांनी कसे जगायचे, केलेला वारेमाप खर्च वसूल होईल का? असे अनेक प्रश्न उत्पादकांना सतावत आहेत. उत्पन्नाअभावी घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. मेहनत घेऊन निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.