
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात राज्य सरकारने मोठी वाढ केली असून, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १५ ऑक्टोबर : राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वसतिगृहातील अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
विविध पदांच्या मानधनात सुधारणा
महानगर क्षेत्र तसेच अ आणि ब वर्गातील महानगरपालिका क्षेत्रांतील वसतिगृह कर्मचाऱ्यांना सुधारित रचनेनुसार अधिक मानधन मिळणार आहे. यानुसार अधीक्षकांचे मानधन १० हजार रुपयांवरून वाढवून २० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचे मानधन ८ हजार ५०० रुपयांवरून १७ हजार रुपये करण्यात आले आहे. मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन ७ हजार ५०० रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यात आले आहे.
उरलेल्या क्षेत्रांसाठी स्वतंत्र तरतूद
राज्यातील उर्वरित क्षेत्रांतील वसतिगृहांसाठी स्वतंत्र मानधनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार उर्वरित भागातील अधीक्षकांना १५ हजार रुपये, स्वयंपाकी यांना १२ हजार रुपये तर मदतनीस व चौकीदार यांना प्रत्येकी १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. मुलींच्या वसतिगृहांमध्ये महिला अधीक्षक आणि चोवीस तास सुरक्षा रक्षक असणे अनिवार्य करण्यात आले असून, या निर्णयामुळे वसतिगृहांच्या कामकाजात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





