ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…


स्थैर्य, मुंबई, दि.१९ : सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं असून महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याचं चित्र आहे. दुसरीकडे १४ हजार पैकी ६ हजार पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास भाजपाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही शिंदे यांना धक्का दिला आहे. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून विकासाचा मुद्दा मांडला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“ग्रामपंचायतीमध्ये कोणताही झेंडा किंवा चिन्ह घेऊन लढत नसतो, तिथे कार्यकर्ते असतात. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आणि चांगली ताकद लावली. त्यातूनच हा विजय झाला आहे. पुढील काही दिवसांत एक नंबर, दोन नंबर कोण या गोष्टी कळतील. आज हे सांगणं योग्य नाही. पण काम करताना सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच काम करावं लागेल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“ज्या ठिकाणी अनेक वर्ष काही ठराविक लोकांकडे सत्ता आहे मात्र तरीही विकास झाला नाही तिथे लोकांनी मोठ्या प्रमाणात बदल केलेला दिसत आहे. लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विकासाची कामं करु. इतकंच नाही तर ज्या ग्रामपंचायतींमध्ये कदाचित आमच्या विचारांचे सदस्य नसतील पण लोकं, मतदार आमचीच आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल,” असं आश्वासन रोहित पवार यांनी यावेळी दिलं.

“काही ठिकाणी समीरकरण बसवत असताना काही पक्षांना मोठं मन दाखवावं लागतं. कोणत्या पक्षाचे किती सदस्य निवडून आले हे सांगणं कठीण आहे. आपण एक नंबर असल्याचं सांगणं सध्या योग्य नाही. कोणता पक्षा आणि विचाराचे लोक ताकदीनं निवडून आले आहेत हे येणाऱ्या दिवसांत कळेल,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या राम शिंदेंविरुद्ध रोहित पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. त्याचे परिणाम हळूहळू दिसून येत आहे. राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांचा गट विजयी झाला आहे. चौंडी ग्रामपंचायतीतील ९ पैकी ७ जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!