सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । मुंबई । सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, पुणे म्हाडा मंडळाच्या ५ हजार २११ सदनिकांसाठी सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले आणि ७१ हजारांपेक्षा अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन यात सहभाग नोंदविला, हे शासन आणि म्हाडाची विश्वासार्हता वाढीला लागल्याचे उत्तम उदाहरण आहे. आज सोडत काढण्यात आलेल्या सदनिकांपैकी तीन हजार घरे ही तयार असून पुढील दीड महिन्यात त्यांचे वाटप केले जाईल तर उर्वरित सदनिकांचे काम एक-दीड वर्षात पूर्ण करुन त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वतःचे घर हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घरांची संकल्पना मांडली आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत असे सांगून हे सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल असणारा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यंत्रणांनी जोमाने काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात म्हाडाचा मोठा सहभाग आहे, राज्यात विविध गृह प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी गृहनिर्माण योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 


Back to top button
Don`t copy text!