दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या उर्फ राकेश संपत निंभोरे (वय २८, राहणार सात सर्कल, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याच्यावर शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे तसेच मालमत्तेविरुद्धचे जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीची साखरवाडी भागात दहशत आहे. हा आरोपी काही महिन्यांपूर्वीच खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त होऊन बाहेर आलेला आहे. तरीसुद्धा त्याच्या छोट्या-मोठ्या कारवाया सुरू होत्या. या आरोपीविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत प्रांताधिकारी फलटण यांना पाठवण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडावे म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी या आरोपीला सहा महिन्यांसाठी सोलापूर, पुणे ग्रामीण व सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. बुधवारी या आदेशाची आरोपीवर बजावणी करण्यात आली.
हा आरोपी सहा महिने या भागात दिसून आल्यास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला किंवा डायरेक्ट ११२ ला संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार श्रीनाथ कदम, पोलीस नाईक नितीन चतुरे, पोलीस अंमलदार हनुमंत दडस, श्रीकांत खरात, सुजित मेंगावडे, अमोल जगदाळे यांनी केली आहे.