आदर्की खुर्द येथे डोक्यात कुर्‍हाड घालून एकाचा निर्घृण खून; आरोपी एका तासात जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२४ | फलटण |
आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत चिंचेचा मळा नावच्या शिवारात चंद्रशेखर बबनराव निंबाळकर (वय ४८, रा. आदर्की खुर्द) यांनी शेताच्या बांधावरून बोअरवेलची मशीन व पिकअप जीप नेऊन बांध खराब केल्याचा राग मनात धरून आरोपी सयाजी शंकर निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून त्यांचा निर्घृण खून केला. या घटनेची फिर्याद मयताचा मुलगा चैतन्य चंद्रशेखर निंबाळकर याने लोणंद पोलीस ठाण्यात दिली.

खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले यांनी तपास सुरू केला.

आदर्की बु. व आदर्की खुर्द गावाच्या ग्रामसुरक्षा यंत्रणेला आरोपी सयाजी शंकर निंबाळकर (रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) याचा शोध घेण्याकामी सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी हा आदर्की गावात चिंचेचा मळा नावच्या शिवारात ओढ्याजवळ असल्याबाबत माहिती मिळाल्याने लोणंद पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीस सापळा रचून पकडले. त्यानंतर आरोपीस अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, फलटण न्यायालयात हजर केले असता आरोपीस ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, नितीन भोसले, नाना भिसे, चंद्रकांत काकडे, विठ्ठल काळे, अभिजित घनवट, बापू मदने, सतीश दडस, सिध्देश्वर वाघमोडे, चालक संजय चव्हाण यांनी केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुशील भोसले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!