अश्‍लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करीत असाल तर व्हा सावधान; सोशल मीडियावरील गंमत येईल अंगलट!


 

स्थैर्य, नागपूर, दि.१९: सोशल मीडियावर केवळ गंमत-जंमत म्हणून किंवा कळत-नकळत अश्‍लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करीत असाल तर आजच सावधान व्हा. तुम्ही केवळ विनोद करण्यासाठी शेअर केलेल्या व्हिडिओ, फोटोमुळे अडचणीत येऊ शकता. कारण, कोणत्याही लहान मुलांचे अश्‍लील फोटो अपलोड केल्यास थेट ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे गुन्हे दाखल होणार आहेत. नागपूर पोलिसांनी सोशल मीडियावरील असे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना टार्गेट केले असून, नागपुरात आत्तापर्यंत अशाप्रकारचे १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत सायबर पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. लहान मुलांची अश्लील साहित्य (छायाचित्रे, व्हिडिओ) मोबाईल, कॅम्प्युटरवर पाहणे, फॉरवर्ड करणे आणि ‘पोर्नोग्राफी’ला प्रोत्साहन देणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक जण ‘व्हॉट्सॲप’वर पोर्न व्हिडिओ आणि अश्‍लील छायाचित्रे पाठवीत असतात.

जवळपास ८० टक्के लोकांच्या हाती स्मार्टफोन आला असून, मोबाईल ‘डाटा’ खूप स्वस्त झाला आहे. त्यामुळे अनेक जण फावल्या वेळात विविध प्रकारच्या पॉर्न वेबसाइटवर जाऊन अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो पाहत असतात. ‘व्हॉट्सॲप’मध्ये तर अशा बाबींसाठी ‘स्पेशल ग्रुप’ बनवलेले असतात. त्यातून अश्‍लीलतेची देवाण-घेवाण होते.

त्यामुळे सायबर सेलद्वारे त्यावर कारवाई करीत असून संशयितांचे प्रोफाईल नेम, जीयोग्राफीकल लोकेशन, आयपी एड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादींबाबत माहिती काढली जात आहे. त्यामुळे कुणी जर लहान मुलांचे अर्धनग्न किंवा नग्न फोटो शेअर केले असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

भारतातील चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ११ महिन्यांत जवळपास ४५ हजारांपेक्षा जास्त चाईल्ड पॉर्न व्हिडिओ आणि फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर अपलोड झाले आहेत. यामध्ये राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा टॉप ५ मध्ये समावेश होतो.

सर्वांत जास्त अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो ‘व्हॉट्सॲप’वरून शेअर केले जातात. ग्रुपमध्ये जर कुणी सदस्य अश्‍लील व्हिडिओ पोस्ट करीत असेल तर त्याची जबाबदारी ‘ग्रुप ॲडमीन’ची असणार आहे. त्यामुळे सायबर पोलिस अनेक ‘व्हॉट्सॲप ग्रुप’वर लक्ष ठेवून आहेत. आत्तापर्यंत नागपूर पोलिसांनी काही ‘व्हॉट्सॲप ग्रुप’च्या ॲडमीनची चांगली धुलाई केली असून, त्यांचे महागडे मोबाईलही जप्त केल्याची माहिती आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!