दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत आठवड्यापूर्वी घडलेल्या अजित बुरुंगले याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस फलटण ग्रामीण पोलिसांनी काल शिताफीने पकडले.
बुरुंगले याचा खून करून मृतदेह नीरा उजवा कॅनॉलमध्ये टाकून दिला होता. या खुनाचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणून यातील एक आरोपी करण विठ्ठल भोसले यास फलटण शहर पोलिसांनी पकडले होते. मात्र, दुसरा आरोपी राहुल उत्तम इंगोले (रा. लोहगाव, पुणे) हा फरारी होता.
फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक या आरोपीच्या मागावर होती. त्याप्रमाणे गोपनीय व तांत्रिक विश्लेषण करून आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपीस पुढील तपासकामी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. उपनिरीक्षक सागर अरडगे, पो.ना. नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पो.कॉ. श्रीकांत खरात, हनुमंत दडस यांनी केली.