शाळांजवळ जंक फूड विक्रीवर कडक नियम; FSSAI चा नवा मसुदा प्रसिद्ध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

शाळांच्या ५० मीटर परिसरात जास्त मीठ, साखर आणि फॅट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी FSSAI ने नवीन मसुदा जारी केला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २५ सप्टेंबर : देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळांच्या परिसरात आणि ५० मीटरच्या दायऱ्यात जास्त मीठ, साखर आणि फॅट (HFSS) असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर तसेच जाहिरातींवर कडक नियम लागू करण्यासाठी नवा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे शाळांच्या आसपास मिळणाऱ्या असुरक्षित अन्नाला आळा बसून विद्यार्थ्यांना आरोग्यादायी आहार मिळण्यास मदत होणार आहे.

पोषक घटकांच्या आधारे ठरमार विक्रीची पात्रता

नव्या मसुद्यानुसार, शाळांच्या परिसरात कोणता खाद्यपदार्थ विकला जाऊ शकतो आणि कोणता नाही, हे त्यातील साखर, मीठ आणि फॅटच्या प्रमाणावर ठरवले जाईल. चिप्स, शीतपेये, बिस्किटे किंवा पॅकेज्ड स्नॅक्सवर थेट सरसकट बंदी न घालता, त्यांच्यातील पोषणमूल्यांची तपासणी करूनच निर्णय घेतला जाणार आहे. शालेय कॅन्टीन, मेस, वसतिगृह आणि शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ५० मीटरच्या अंतरात या नियमांचे पालन करणे सर्व अन्न विक्रेत्यांसाठी बंधनकारक असेल.

‘ईट राईट स्कूल’ उपक्रमावर भर

या नियमांची योग्य अंमलबजावणी करण्याची आणि त्यावर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी राज्य शासनांच्या अन्न व औषध प्रशासनाची असणार आहे. याशिवाय शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराबाबत जागरूक केले जाईल. मसुदा अंतिम झाल्यानंतर शाळांमधील कर्मचाऱ्यांना आणि कॅन्टीन चालकांना विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात शाळांच्या आवारात आरोग्यदायी आहाराला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

Back to top button
Don`t copy text!