
थेट WhatsApp वर मिळवा
गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशी पूजेसाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६:१२ वाजल्यापासून रात्री १०:४४ वाजेपर्यंत विविध शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. २५ सप्टेंबर : आनंदमयी आणि उत्साही वातावरणात सुरू झालेल्या १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत आहे. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असून पंचांगानुसार २५ सप्टेंबर रोजी दिवसभर विसर्जनासाठी अनेक शुभ आणि अमृत चौघडिया मुहूर्त उपलब्ध आहेत. शास्त्रोक्त नियमांनुसार योग्य मुहूर्तावर विसर्जन केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दिवसभरातील शुभ विसर्जन मुहूर्त
पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ६:१२ ते १०:४३ या वेळेत चर, लाभ आणि अमृत असा अत्यंत शुभ काळ आहे. त्यानंतर दुपारी १२:१३ ते १:४४ या वेळेत शुभ चौघडिया उपलब्ध राहील. सायंकाळी ४:४५ ते ६:१५ या वेळेत चर मुहूर्त, तर रात्री विसर्जन करणाऱ्यांसाठी ९:१४ ते १०:४४ ही वेळ कल्याणकारी मानली गेली आहे. भाविक आपल्या परंपरेनुसार आणि सोयीनुसार यातील कोणत्याही मुहूर्तावर बाप्पाला भावपूर्ण निरोप देऊ शकतात.
उत्तरपूजा आणि विसर्जन विधी
विसर्जनापूर्वी घरात किंवा मंडपात बाप्पाची विधिवत उत्तरपूजा आणि आरती करणे आवश्यक आहे. पूजेनंतर देवाला मोदक अथवा लाडूचा नैवेद्य दाखवून कपाळावर अक्षता आणि गुलाल लावावा. त्यानंतर मूर्ती स्वतःच्या जागेवरून थोडी पुढे हलवून ‘मूर्ती विस्थापन’ करावे. नदी, तलाव किंवा घरच्या घरी कृत्रिम हौदात बाप्पाचे विसर्जन करताना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत निरोप द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.