
दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । बार्शी । जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली 0ते 18 वयोगटातील मुलांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय आणि सुश्रुत हॉस्पीटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आज बार्शी, माढा, वडाळा, मोहोळ, करमाळा या तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील संशयित ह्रदयरोग 200 मुलांची मोफत टू डी ईको तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गुंड यांनी दिली.
शिबिरासाठी बालाजी हॉस्पीटल, मुबंई येथील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण, त्यांचे सहकारी प्रतिक मिश्रा हे या शिबारासाठी उपस्थित होते. टू डी ईको तपासणीसाठी खाजगी दवाखान्यात 1500 ते 2000 रुपये पर्यंतचा खर्च झाला असता. ग्रामीण रुग्णालय बार्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.शितल बोपलकर, सुश्रुत हॉस्पीटलचे डॉ.अंधारे यांनी प्रयत्न करून शिबीराचे आयोजन केले होते. ह्रदयरोग शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्यांची शस्त्रकिया बालाजी हॉस्पीटल, मुंबई तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण 4753 अंगणवाड्यातील मुलांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी केली जाते. एकूण 4109 शाळेतील मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. यात प्रामुख्याने मुलांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधणे हा महत्वाचा भाग आहे. जन्मत: व्यंग, पोषण द्रव्याची कमतरता, शारिरीक व मानसिक विकासात्मक बदल, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारावर उपचार व निदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविले जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल 2022 ते आजतागायत 42 हृदयरोग व 80 इतर शस्त्रक्रिया मोफत झाल्या. यातून गरीब व कष्टकरी व ग्रामीण भागातील जनतेला मोठे आर्थिक व आरोग्यविषयक सहकार्य लाभले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून कार्यक्रम सुरु झाल्यापासून आजतागायत 1240 मुलांच्या हृदयरोग शस्त्रक्रिया (ज्या शस्त्रक्रियासाठी अंदाजित दीड लाख रुपये ते 7 लाखापर्यंत खर्च अपेक्षित), 3318 मुलांच्या इतर शस्त्रक्रिया (ज्या शस्त्रक्रियासाठी अंदाजित 10 हजार रुपये ते 10 लाखापर्यंत खर्च अपेक्षित) अशा इतर रोग शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत.
या कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजना, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सिव्हील हॉस्पीटल, विविध स्वयंसेवी संस्था व आरोग्य विभाग, मुंबई यांच्याकडून करार झालेली विविध रुग्णालये येथे मोफत शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. तसेच अनेक किरकोळ आजारी मुलांना जागेवरच उपचार देऊन यातून गंभीर आजारापासून वाचविण्यात आलेले आहेत.
गरीब मुलांच्या पालकांनी मोठ्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकाशी संपर्क साधावा
आरोग्य तपासणी शिबीर गरीब व कष्टकरी मुलांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असून आजतागायत जिल्ह्यातील 4500 मुलांच्या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून पार पडल्या आहेत. ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्या पालकांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकांशी संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोंगडे यांनी केले आहे.