
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत फलटण आगाराकडून मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना शाळेतच मोफत बस पास देण्यात आले. यामुळे मोठा दिलासा मिळाला.
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत फलटण आगाराच्या वतीने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना शाळेतच मोफत बस पास वितरित करण्यात आले. या महत्त्वपूर्ण सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित झाला आहे.
वेळेची आणि पैशांची बचत
या योजनेमुळे विद्यार्थिनींचा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी याचा मोठा फायदा होत आहे. शाळेतच पास उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनी व पालकांची आगारात जाण्याची धावपळ टळली आहे. तसेच नियमित बससेवेचा लाभ मिळत असल्याने पैशांची आणि वेळेची मोठी बचत होत आहे. शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ थेट विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरला आहे.
एसटी अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार
शाळेच्या ठिकाणी पास वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फलटण आगारातील वाहतूक नियंत्रक गोपी जाधव आणि प्रवीण अहिवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सहकार्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे आणि उपप्राचार्य सोमनाथ माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिवहन समितीचे ज्ञानेश्वर बोंद्रे, चेतन बोबडे, भोईटे, सुधाकर वाकुडकर, राजेंद्र गोडसे, श्रीकांत तावरे, सागर बोराटे, रणजित नार्वेकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.