दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | वाई | तलवारी सारख्या घातक शस्त्रांसह फिरून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना शस्त्रांसह वाई पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मागील आठ दिवसांपासून शहरातील चार तरुण तलवारीसारखी घातक शस्त्रे बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे शस्त्रे असून ते शहरात शस्त्रांसह फिरून दहशतीचे वातावरण निर्माण करीत होते. त्यामुळे सदर मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ श्रावण राठोड किरण निंबाळकर व सोनाली माने यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. आज दुपारच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना वाई पाचगणी रस्त्यावर दुकानाच्या समोर फुटपाथ वर उभे असलेल्या नितीन विजय भोसले ( वय १९ सिद्धनाथ वाडी) विजय लक्ष्मण अंकुशी ( वय २१ धोमकॉलनी) ललिततोश नितीन चौरे (वय १९) सुनील अनिल जाधव राहणार (२१ सोमईनगर) या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्रे मिळून आली. हे कोयते कशाकरता सोबत बाळगले आहेत याबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्याकडून धारदार लोखंडी पाते असलेल्या किंमत चार हजार रुपये किंमत असलेले कोयते जप्त करण्यात आले आहेत.
यातील तिघांवर रविवारपेठ पेटकर कॉलनी येथील गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल आहे.सद्या ते जामीनावर आहेत.