दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । भारत दौऱ्यावर आलेल्या युक्रेनच्या उप विदेशमंत्री एमिन झारपोवा यांनी केलेल्या विधानामुळे भारत धर्मसंकटात पडला आहे. सध्या भारताकडे जी २० चं अध्यक्षपद असून जी २० च्या सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या बैठकीत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेस्की यांना संबोधित करण्याची संधी मिळाल्यास आनंदच होईल, असे झारपोवा यांनी म्हटलंय. तसेच, रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, युक्रेनच्या प्रतिनीधींनाही दिल्लीत होत असलेल्या जी२० परिषदेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणीच मंत्री झारपोवा यांनी केलीय.
सरकारी फंडातून चालत असलेल्या थिंक टँक इंडियन काउंसिल ऑफ वर्ल्ड अफेयर्समध्ये बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. एमिन झारपोवा यांचा हा प्रस्ताव भारतला धर्मसंकटात टाकणार आहे. कारण, यापूर्वीही भारताने युक्रेनच्या राष्ट्रपतींना संयुक्त राष्ट्रात बोलण्याची संधी द्यावी, अशी भूमिका घेतली. त्यावेळी, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू होते. मात्र, यावेळी रशियाने भारताच्या भूमिकेविरुद्ध मतदान केलं होतं.
बाली येथे जी २० शिखर संमेलनाला संबोधित करताना झेलेस्की यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगच्या माध्यमातून भूमिका मांडली होती. आता, त्यांच्याच उप विदेशमंत्री झारपोवा यांनी भारताकडे तसा प्रस्ताव ठेवला आहे. दिल्लीतील जी २० परिषदेत झेलेस्की यांना बोलण्याची संधी द्यावी. मात्र, भारताने झेलेस्की यांना बोलण्याची संधी दिल्यास, भारताच मित्र असलेला रशिया नक्कीच नाराज होईल. त्यामुळे, झारपोवा यांचा हा प्रस्ताव भारताला धर्मसंकटात टाकणारा आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी युक्रेन-रशिया युद्ध सुरू असताना तीनवेळा रशियाचा दौरा केला आहे. त्यामुळे, त्यांनी युक्रेनचाही दौरा करावा, त्याचं स्वागत आहे, असे निमंत्रणच झारपोवा यांनी दिलंय.