महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासात साताऱ्यात प्रथमच मास मॅरेथॉन स्पर्धा


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्या रविवार दि.२ ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता मास मॅरेथॉन स्पर्धा होत असून या स्पर्धेमध्ये १ हजार ९२८ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महिला कामगारांनी उस्फुर्त सहभाग घेतला असल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी दिली.

राजेंद्र मोहिते पुढे म्हणाले, यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित उ‌द्योगातील काम करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आपल्या आरोग्याबाबत, शारीरिक फिटनेसबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) ने उद्या रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी ८ वाजता मॅरथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व ५ किलोमीटरची आहे. स्पर्धेचा शुभारंभ आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार
आहे. तसेच बक्षीस वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी MIDC पुणे चे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे हे उपस्थित राहणार आहेत.

या मॅरथॉन स्पर्धेस मुख्य प्रायोजक म्हणून सातारा औद्योगिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योगसमूह ‘टॉप गिअर ट्रान्समिशन’, सहप्रायोजित जोशी जम्प्ला प्रा. लि. व उत्कर्ष ट्रान्समिशन प्रा.लि. लाभले आहेत. टॉप गिअर ट्रान्समिशन उद्योगाने सामाजिक बांधिलकीने उद्योगाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. रेस डायरेक्टर म्हणून आर्यनमॅन अनुप मुथा, डायरेक्टर, मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.

औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य सुदृढ राहावे या मुख्य हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ कामगारांसाठीच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकांसाठी ही खुली असून स्पर्धेमध्ये १ हजारो ९२८ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे. गोडोली येथील शाळेतील ७० विद्यार्थीही या स्पर्धेत धावणार आहेत. स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या स्पर्धेचा समारोप होईल, अशी माहितीही राजेंद्र मोहिते यांनी दिली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मासचे पदाधिकारी, सर्व संचालक, सदस्य परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!