आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञानासाठी शेतकर्‍यांची ‘शिवार फेरी’

नाना ऊस शेती तंत्रज्ञानाचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२६ | फलटण |
ऊस पिकाचे वाढते उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शिवारात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने ‘ऊस शेती शेतकरी शिवार फेरी व क्षेत्र भेट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भवानीनगर, राजुरी येथील धनंजय पवार (चेअरमन, फलटण सहकारी दूध उत्पादक संघ) यांच्या ऊस शेतीवर या क्षेत्र भेटीचे आयोजन केले होते. यावेळी नाना ऊस शेती तंत्रज्ञानाचे निर्माते, ऊस शेतीतज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शिवारात सविस्तर मार्गदर्शन केले.

ऊस शेती क्षेत्र भेटीदरम्यान लागवडीपासून ते पिकाच्या विविध अवस्थांतील व्यवस्थापनापर्यंतच्या महत्त्वपूर्ण बाबींवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शेतकर्‍यांनी ऊस शेतीतील अडचणी व उत्पादनवाढीशी संबंधित प्रश्न तज्ज्ञांसमोर मांडले. नवनाथ गायकवाड यांनी नाना ऊस शेती तंत्रज्ञानाद्वारे दोन पट्ट्यातील १२ फूट अंतरावर ऊस लागवडीची शिफारस, एकरी १३० टन ऊस उत्पादनाची हमी, अधिकतम ऊस फुटवे, ऊस पाचट व्यवस्थापन तसेच मुख्य उद्देश कमी खर्चात, कमी पाण्यात, अधिक व दर्जेदार ऊस उत्पादन हा आहे. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष शिवारातील उदाहरणांसह उत्तरे देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निंबूतचे ऊस बागायतदार प्रमोद काकडे, खुंटेचे आप्पासाहेब खलाटे, श्रीराम कारखान्याचे संचालक महानंद माने, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी अरविंद निकम, महाविद्यालयीन समिती सदस्य रामदास कदम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांची उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!