अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची आर्थिक मदत करावी

काँग्रेसची सरकारकडे मागणी, राज्यपालांना निवेदन देणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 3 जून 2025। फलटण । सातारा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळझाडे भुईसपाट झाली आहेत, शेतातील माती वाहून गेली आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे व नव्या हंगामाची पेरणी होऊ शकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50000 रुपयांप्रमाणे अर्थसाहाय्य करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

याबाबत प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी रणजितसिंह देशमुख व राजेंद्र शेलार यांनी सरकारला जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन दिले. लवकरच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व पदाधिकारी राज्यपालांना भेटून मागणी करणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचे फार मोठे नुकसान केले आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पूर्व भागात फलटण, माण, खटाव, खंडाळा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे जास्त नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातही काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन माती वाहून गेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने शेतकर्‍यांना पुढील हंगामासाठी पेरणी करणे अवघड झाले आहे. तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने या सर्व नुकसानाचे पंचनामे करायला सुरुवात केली असली तरी ही प्रक्रिया अतिशय धिम्यागतीने सुरू आहे. हे पंचनामे तातडीने करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत लवकरात लवकर कशी पोहोचेल याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळण्यासाठी काँग्रेस पक्ष अभियान राबविणार असून मा. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी सरकारी अधिकार्‍यांच्या कामावर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!