साखरवाडीत बनावट लॅब रिपोर्ट रॅकेट उघडकीस; बुलढाण्यातील डॉक्टरच्या नावाने रुग्णांची फसवणूक

फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, लॅब चालकाला अटक; नामांकित पॅथॉलॉजिस्टच्या बनावट सही आणि नावाने सुरू होता गोरखधंदा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. 13 सप्टेंबर : साखरवाडी, ता. फलटण येथे एका नामांकित पॅथॉलॉजिस्टच्या नावाने आणि बनावट सहीने लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून रुग्ण, डॉक्टर आणि विमा कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ‘धन्वंतरी लॅबोरेटरी‘चा चालक विशाल नाळे याला अटक केली आहे.

ही धक्कादायक घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. ब्रम्हानंद टाले यांच्याकडे एका विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी साखरवाडीतील ‘धन्वंतरी लॅब‘चे काही रिपोर्ट पडताळणीसाठी आणले. या रिपोर्टवर डॉ. टाले यांचे नाव, पदवी आणि बनावट सही छापण्यात आली होती. डॉ. टाले यांनी आपला या लॅबशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, आपल्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून रुग्णांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार १० सप्टेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरवाडी येथील धन्वंतरी लॅबोरेटरीमध्ये पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला कोणताही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसताना, हा अवैध व्यवसाय सुरू होता. कायद्यातून पळवाट काढण्यासाठी आरोपी, डॉ. टाले यांच्या नावाने बनावट रिपोर्ट तयार करून ते प्रमाणित असल्याचे भासवत होते.

डॉ. टाले यांच्या तक्रारीवरून, फलटण ग्रामीण पोलिसांनी लॅब चालक विशाल नाळे, डॉ. बाळासाहेब राऊत आणि इतर दोन आरोपींविरोधात फसवणूक, बनावटगिरी अशा विविध कलमांखाली गुन्हा (गु.रजि.नं. ६४३/२०२५) दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लॅब चालक विशाल नाळे याला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!