पुणेरी माणसाच्या हिंमतीला नाही तोड, चाकू लागल्यानंतरही रक्ताने लिहून ठेवला पुरावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,पुणे,दि २३: पुण्यातील नऱ्हे गावात गाडी चोरांच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वाहनमालकाने घटनेचा पुरावा राहावा म्हणून पार्किंगच्या फरशीवरच ‘4 चोर’ असं रक्ताने लिहून मोठं धारिष्ठ्य दाखवले आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती आता सुधारतेय पण न जाणो आपला जीव गेला तर पाठीमागे काहीतरी पुरावा राहावा म्हणून त्यांनी ही हिंमत दाखवली.

प्रमोद घारे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. सकाळी सोसायटीतले लोक मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर जखमी वाहनमालक प्रमोद घारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्यांचा जीव वाचवला. सिंहगड पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे गावात पहाटे तीनच्या सुमारास चार चोर वाहनचोरीचा प्रयत्न करत होते. पण त्यावेळी खडबडीच्या आवाजाने वाहन चालकाला जाग आली त्यांनी त्यातल्या एका चोराला जागीच पकडलं. त्याला सोडवण्यासाठी इतर चोरांनी वाहनमालक प्रमोद किसन घारे ( वय 35, रा. सिद्धी संकल्प सोसायटी, भूमकर चौकाजवळ, नऱ्हे, पुणे) यांना चाकून भोकसलं आणि पळून गेले. त्यावेळी तब्बल तीन तास हे वाहन चालक तिथेच पार्किंगमध्ये पडून होते. खूप रक्तस्त्राव होताच त्यांना चक्कर येऊ लागली पण त्या ग्लानीतही पाठीमागे पुरावा राहावा म्हणून त्यांनी फरशीवरच ‘4 चोर’ असं स्वत:च्याच रक्ताने लिहून ठेवलं, सुदैवाने ते वाचले. पण सिंहगड पोलीस अजूनही चोरांना पकडू शकलेले नाहीत.

याबाबत प्रमोद घारे यांच्या पत्नीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रमोद घारे राहत असलेल्या सोसायटीत मागील आठवड्यात मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळीही चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला. अशातच सोमवारी पहाटे पुन्हा याच सिद्धी संकल्प सोसायटीत चार चोर वाहनचोरीच्या उद्देशाने आले होते. पण वाहन मालकाने मोठ्या धैर्याने त्यांचा हल्ला परतून लावला. पण त्यात प्रमोद घारे गंभीर जखमी झालेत. या सोसायटीला वॉचमन नाही तिथे झाडलोट करणारी महिलाच तिथं राखणदारीचं काम पाहत असल्याचं सांगितलं जातं आहे.


Back to top button
Don`t copy text!