आवश्यक त्या सर्व ठिकाणी उपचार सुविधांची उभारणी – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अमरावती, दि.२१: जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणा काटेकोर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना गती देत आता जिल्हा परिषदेच्या विश्राम गृह येथे कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. यानंतरही आवश्यक तिथे उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षता नियम पाळून स्वत:सह इतरांचीही सुरक्षितता जोपासावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

येथील मालटेकडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर तथा समुपदेशन केंद्राचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पुजाताई आमले, समाजकल्याण सभापती दयारामजी काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज कोविड केअर सेंटरचे लोकार्पण होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संकल्पनेतून या महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात होत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड वर्षापासून शासन, महसूल, पोलीस विभागासह आरोग्य विभाग आदी कोरोनाला थोपविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. सध्याची वेळ अतिशय कठीण असून, या संकटकाळात प्रत्येकाने जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच स्वत:ची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रतिबंध लावण्यात आले आहे. नागरीकांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले.

जिल्ह्यात कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी उपचारयंत्रणा उभारण्याबरोबरच जाणीवजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा तत्काळ वैद्यकीय तपासणी व  उपचार घ्यावा. वेळीच उपचार केला तर यातून पूर्णपणे बरे होता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अशी आहे आरोग्य सुविधा

या कोविड केअर सेंटरला सद्य:स्थितीत 20 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले आहे. यापुढे आणखी दहा बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अतितातडीच्या वेळी कोरोनाच्या रुग्णांना याचा उपयोग होईल.

या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!