दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२३ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे विधी सहाय्य बचाव अभिरक्षक प्रणाली (LADCS) कक्षाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. जिल्हा न्यायाधिश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या फौजदारी प्रकारणांत मोफत सेवा देण्यात येते. या प्रणाली कक्षाकरिता ॲड आकाश महांगडे, ॲड. संजय महागावकर, ॲड सुचिता पाटील, ॲङ आशिष राठोड आणि ॲङ यश गोडखिंडी या 5 निष्णात विधिज्ञांची निवड करण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे कारागृहातील गरजू कैद्यांसाठी उत्कृष्ट आणि नि:शुल्क कायदेशीर सेवा प्रदान करणे, या कक्षाला भेट देणाऱ्या व्यक्तिंना फौजदारी स्वरुपाच्या प्रकरणाकरिता कायदेशीर सल्ला व सहाय्य दिले जाणार आहे. तसेच पोलिसांकडून अटक होण्यापासून ते विशेषत: कारागृहातील गरजू कैद्यांची फौजदारी प्रकरणे चालविणे, अपील दाखल करणे, जामीन करणे, कथीत गुन्ह्याच्या ठिकाणी/क्षेत्राला भेट देणे. या योजनेंतर्गत जिल्हा कारागृह येथील पुरुष व महिला बंद्यांची दररोज भेट घेऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे व बंद्यांच्या कुटुंबाशी चर्चा करणे इ. सहाय्य मिळणार आहे.
आतापर्यंत 25 ते 30 फौजदारी प्रकरणांमध्ये या योजनेंतर्गत मोफत सेवा देण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील 5 कैद्यांची जामीनावर मुक्तता करण्यात यश मिळाले आहे. तसेच सहाय्यक विधी सहाय्य संरक्षण अभिरक्षक यांच्यामार्फत काम चालवून भा.दं.सं.कलम 354 अंतर्गत प्रलंबित असलेला खटला निकाली काढण्यात येवून त्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर सरकारी वकीलांच्या कार्यालयाशेजारी स्वतंत्र लोक अभिरक्षक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. तरी या प्रणालीचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.