पर्यावरणाच्या रक्षणार्थ ‘लोकप्रतिनिधीं’ना प्रोत्साहन


दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । फलटण । ‘पर्यावरण रक्षणा’ची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या पर्यावरणाचे दुष्परिणाम इतके गंभीर आहेत की, वेळीच याबाबत सतर्क होवून योग्य त्या उपाययोजना करणे अतिशय क्रमप्राप्त बनले आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून महाराष्ट्रात निकोप पर्यावरण चळवळ वाढवण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पर्यावरण रक्षणाची मोहिम अगदी मोठमोठ्या शहरांपासून खडोपाडी-वाडीवस्तीवर पोहचवण्यासाठी विधीमंडळाच्या माध्यमातून या मोहिमेत लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग घडवून आणण्याचा त्यांचा दृष्टीकोन विशेष अभिनंदनीय आहे. शासनस्तरावरुन पर्यावरण संवर्धनाविषयी मोहिमा सुरुच असतात पण या मोहिमांमध्ये लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग आल्यास लोकप्रतिनिधींबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही पर्यावरणाचा प्रश्‍न किती गंभीर आहे हे लक्षात येईल आणि मगच नागरिकांमधूनही पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळेल; याकरिता ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधीमंडळ स्तरावरुन सुरु केलेले प्रयत्न नक्कीच दिशादर्शक आणि परिणामकारक ठरतील, अशी आशा आहे.

आज जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास या सर्व गोष्टी अखंड मानवजातीसाठी धोक्याची घंटा बनल्या आहेत. भविष्यात ‘पर्यावरणात दिवसागणिक होणारे प्रतिकूल बदल’ जीव सृष्टीचा विनाश होण्याचे महत्त्वाचे कारण ठरु शकतात. किंबहुना आत्ताही बर्‍याचअंशी ऋतुचक्रात होणारे बदल, वारंवार येणारे पूर, दुष्काळ, वादळे असे पर्यावरणाच्या बिघडलेल्या घडीचे एक ना अनेक दुष्परिणाम आपण सातत्याने अनुभवतही आहोत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी व संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि अखंड मानवजातीच्या रक्षणासाठी सर्वांनीच ‘पर्यावरणपूरक’ बनणे गरजेचे बनले आहे. ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी अनेकदा आपल्याला देत असतात; संभाव्य धोके अधोरेखित करीत असतात पण त्यांचे सल्ले किती लोक मनावर घेतात? या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्मकच आहे. आज ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही वाक्ये केवळ घोषणेपुरतीच मर्यादित राहिली आहेत. कारण आपल्याकडे एखादा ‘सोशल इव्हेंट’ म्हणून झाडे दिमाखात लावली जातात पण ‘झाडे जगवा’ याचा विसर सर्वांनाच पडतो. ‘दरवर्षी वृक्षारोपण; पण खड्डा तोच’ असेही वृक्षारोपणाच्या दिखाऊपणाचे उपरोधिक वर्णन केले जाते. वृक्षतोड, वायू प्रदूषण, जल प्रदूषण वा अन्य काही असो, एखादे नैसर्गिक संकट आले की; तेव्हढ्यापुरत्या पर्यावरण रक्षणाच्या गप्पा मारायच्या आणि पुन्हा पुढचे नैसर्गिक संकट येईपर्यंत या प्रश्‍नावर ‘चुप्पी’ ठेवायची; अशी परिस्थिती आजवर या समस्येच्या बाबतीत पहायला मिळाली आहे.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांमधील पर्यावरण रक्षणाच्या बाबतीतली उदासिनता आणि बेफीकीरी कमी करणे गरजेचे असून या कार्यात लोकप्रतिनिधींचा सक्तीचा प्रत्यक्ष सहभाग उपयोगी ठरु शकतो. लोकप्रतिनिधींना पर्यावरण विषयक कार्य सक्तीचे करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी विधीमंडळ स्तरावरुन ना.श्रीमंत रामराजे यांनी सुरु केल्या आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे व अन्य विधीमंडळ सदस्यांना बरोबर घेवून या प्रश्‍नावर निरंतर काम करण्यासाठी वैधानिक समितीही ते गठीत करणार आहेत. शिवाय याच अनुषंगाने त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष सहभागासाठी पहिले कृतीशील पाऊल म्हणून, 1) येत्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ सदस्यांना ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षणाची शपथ देणे. 2) पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी आमदार निधीतून खर्च करण्यास परवानगी देणे. 3) पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण विभागाने पुढाकार घेवून नगरविकास, वने, महसूल, ऊर्जा, परिवहन, उद्योग या विभागांना बरोबर घेवून काम करणे. 4) प्रदूषण उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी पुढाकार घेणे आणि 5) सर्वात लक्षणीय म्हणजे इथून पुढील निवडणूकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने आपल्या मतदारसंघात किमान 10 वृक्षांची लागवड करणे आवश्यक असल्याची अट लागू करणे अशा महत्त्वपूर्ण शिफारसी मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व शिफारसी पर्यावरणाच्या रक्षणार्थ लोकप्रतिनिधींना प्रोत्साहित करणार्‍याच आहेत.

शेवटचा मुद्दा –

वास्तविक पाहता पर्यावरण संवर्धनाची चळवळ आजवर निसर्ग प्रेमींपुरती मर्यादित राहिली आहे; हे या चळवळीचे एक मोठे अपयश आहे. त्यामुळे या चळवळीत प्रत्येक नागरिकाला सोबत घेवून ही चळवळ खर्‍या अर्थाने व्यापक बनवून ती एक ‘लोकचळवळ’ होण्यासाठी यामधील लोकप्रतिनिधींचा सहभाग निर्णायक ठरु शकतो; कारण, जनतेवर या लोकप्रतिनिधींचा मोठा प्रभाव असतो. पण हे यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला लोकप्रतिनिधींनी पर्यावरणासंबंधीच्या समस्यांची व्यापकता, दुष्परिणाम व उपाययोजना गांभीर्याने समजून घेवून याबाबतीत प्राधान्याने संपूर्ण देशाला व जगाला मार्गदर्शक ठरतील असे जनजागृतीचे कृतीशील कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी योग्य रितीनी पार पाडणे अपेक्षित !

– रोहित वाकडे,
संपादक, साप्ताहिक लोकजागर, फलटण.


Back to top button
Don`t copy text!