
दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद नगर, रायगड हॉटेल, गिरवी नाका यासह या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले असून याबाबत फलटण नगरपालिकेला येथील नागरिकांनी लेखी निवेदन देऊन सुद्धा याच्यावर काहीच कार्यवाही पालिकेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे का ? असा सवाल सुद्धा नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे.
फलटण शहराच्या स्वामी विवेकानंद नगरमध्ये दर आठवड्याला आठवडी बाजार बसत आहे. कोरोना काळापासून शहरांमधील बाजार बाहेर बसायला सुरुवात झालेली आहे. गिरवी नाका ते रायगड हॉटेल या ठिकाणी आठवडी बाजार सध्या बसत आहे. त्यामुळे बाजार बसून झाल्यानंतर संपूर्ण बाजारामध्ये राहिलेला कचरा हा स्वामी विवेकानंद नगर मध्ये तेथील व्यापाऱ्यांकडून टाकण्यात येत आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद नगर संपूर्ण घाणीच्या साम्राज्यात सापडलेले आहे. तरी बाजार बसून झाल्यानंतर व दररोज सुद्धा फलटण नगरपालिकेकडून साफसफाई नित्याने करण्यात यावी, अशी मागणी ही नागरिकांच्या मधून होत आहे.
याबाबत स्वामी विवेकानंद नगर मधील रहिवासी रोहन दिलीप पवार यांनी फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना लेखी निवेदन सादर केलेले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.