फलटणमध्ये प्रचाराचा ‘सुपर सॅटरडे’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साखरवाडीत तोफ धडाडणार! राजे गटाच्या सभेसाठी दिग्गजांची फौज सज्ज


फलटण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (शनिवार, दि. ३१) साखरवाडी दौऱ्यावर. राजे गट प्रणित शिवसेनेची भव्य सभा. पालकमंत्री शंभूराज देसाई, रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जानेवारी : फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या रणधुमाळीत आता ‘हायव्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळणार असून, राजे गट प्रणित शिवसेनेच्या (Raje Group Shivsena) उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज, शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी फलटण दौऱ्यावर येत आहेत.

साखरवाडी (ता. फलटण) येथील बाजारतळ (Bazar Tal) मैदानावर सकाळी १० वाजता त्यांची भव्य जाहीर सभा होणार असून, या सभेने प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

दिग्गजांची मांदियाळी या सभेसाठी केवळ एकनाथ शिंदेच नव्हे, तर शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामध्ये सातारचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे राजे गट प्रणित शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. साखरवाडी हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असल्याने, या सभेच्या माध्यमातून राजे गट मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. साखरवाडीसह परिसरातील गावांमधून नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!