सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२३ । नागपूर । यंदाच्या अर्थसंकल्पात पाचशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनाच्या शुभपर्वावर दोनच महिन्यात 317 दवाखाने आज राज्यभरात सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज 12 दवाखाने सुरु झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला आरोग्याविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा  उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीने मुंबईवरुन  या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण राज्यात 317 ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यातील 12 ठिकाणांचा यात समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती होती. उस्मानाबादहून आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत उपस्थित होते.

आपला दवाखाना हा एक अतिशय लोकाभिमुख उपक्रम आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून 30 विविध सेवा निःशुल्क देण्यात येणार आहे. या दवाखान्यांमध्ये विविध एक्सपर्टला बोलवून एक्सपर्ट कन्सल्टेशन देखील निःशुल्क मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून सुरू होत असून आपल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात आज त्याचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकार्पणप्रसंगी आ.प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य उपसंचालक डॅा. विनिता जैन यांच्यासह महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 12 ठिकाणी शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्ह्यात बारा ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रामुख्याने समावेश आहे. शहरातील डोरले ले आऊट,  ग्रामीणमधील हिंगणा, कामठी, कुही ,मौदा, वाडी, मोवाड ता. नरखेड, पारशिवणी, रामटेक, थापा ता. सावनेर, उमरेड आणि भिवापूर अशा एकूण 12 ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

निःशुल्क तपासणी, उपचार आणि औषधी

आपला दवाखान्यामध्ये मोफत उपचार, तपासणी आणि औषधी देण्यात येणार आहेत. दवाखान्यात सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे. बाह्यरुग्ण सेवा, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी लसीकरण या सुविधा प्रामुख्याने पुरविण्यात येणार आहेत.

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा या दवाखान्यात पुरविण्यात येणार आहेत.  यात फिजिशियन स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, नाक कान घसा तज्ज्ञ यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

पुरेसे मनुष्यबळ असणार उपलब्ध

दवाखान्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, मदतनीस यांचा समावेश असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!