श्रीमंत रामराजेंच्या प्रयत्नाने मुरुमला पर्यटन क्षेत्राचा दर्जा व भरीव निधीची तरतूद : डी. के. पवार


स्थैर्य, फलटण, दि. ०३ : अटकेपार झेंडे लावणारे शूरवीर, पराक्रमी योध्ये मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव मुरुम, ता. फलटण पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ लि., मुंबईचे (महानंद) व्हा. चेअरमन डी. के. पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने मुरुम, ता. फलटण हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याच्या महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीस मान्यता देऊन ब क्षेत्राचा दर्जा देऊन पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले असून त्यापैकी विकास कामाचा शुभारंभ महानंदचे व्हा. चेअरमन डी. के. पवार, फलटण पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. प्रियंका योगेश बोंद्रे, उपसरपंच संतोष उत्तम बोंद्रे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील सौ. वनिता संकपाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराजा मल्हाराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून अटकेपार झेंडे लावले अशा शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्म गाव मुरुम, ता. फलटण असूनही त्याबाबत फारशी माहिती नव्हती मात्र गेल्या ७/८ वर्षांपासून हे गाव महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आले. सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा मल्हाराव होळकर यांची जयंती सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरुम येथे समारंभपूर्वक साजरी करण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने संपूर्ण इतिहास लोकांसमोर आला आणि हे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सकल्पनेमुळे त्याला देश पातळीवर प्रसिद्धी लाभली आहे.

सुमारे दोन महिन्यापूर्वी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या संपर्कातून महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे वंशज महाराजा श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी मुरुम गावी भेट दिली आहे. या भेटीवेळी फलटणच्या राजघराण्यातील युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहुन यशवंतराव होळकर यांचे यथोचित स्वागत केले होते. त्यावेळी आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी, लवकरच महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या गावाच्या विकास कामासाठी भरघोस निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते.

महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून मुरुम गावचा विविधांगी विकास करण्याची योजना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटणच्या राजघराण्याच्या माध्यमातून तयार करण्यात येत असताना राज्य शासनाने मुरुम ला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने आगामी काळात मुरुमला राज्य स्तरावर वेगळे महत्व प्राप्त होईल असा विश्वास डी. के. पवार व शंकरराव माडकर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.

राज्य शासनाने पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रमातून पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले असून सातारा जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग फलटणच्या माध्यमातून सदर मंजूर विकास कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील याची ग्वाही सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

या कामामध्ये ५० लाख ३४ हजार रुपये भक्त निवास, २८ लाख ३९ हजार रुपये सभा मंडप, ३० लाख ३० हजार रुपये नीरा नदी घाट, ८ लाख ३८ हजार रुपये स्वच्छता गृह, ४ लाख ३२ हजार पथ दिवे आणि २९ लाख २८ हजार रुपये अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कामाचा समावेश असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग फलटणचे उपअभियंता सुनील गरुड यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!