स्थैर्य, जावळी, दि. १२ : मद्यधुंद पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून आईलाही काठीने बेदम मारहाण केली असल्याची घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपी विनोद बबन शिंदे (वय 38, रा. सोनगाव) याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, घरातील टीव्हीचा आवाज पत्नीने कमी करण्यास सांगितले म्हणून रागात आलेल्या मद्यधुंद पती विनोद शिंदे याने दाराच्या जवळील असणारा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्यात घातला. हा सर्व प्रकार सुरू असतानाच मध्यस्थी करणार्या जन्मदात्या आईला देखील घरात असणार्या काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सोनगाव येथे घडला असून, यासंदर्भात पत्नी पल्लवी विनोद शिंदे (वय 30) यांनी पती विनोद शिंदे याच्या विरोधात कुडाळ पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिल्यानंतर झालेला प्रकार सांगितला आहे, यावरून कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मद्यधुंद अवस्थेत पती विनोद शिंदेने पत्नी आणि आईला दगड व काठीने मारहाण करून जखमी केले. पत्नी पल्लवी शिंदे यांच्या डोक्याला जखम झाली आहे तर आईच्या अंगावर काठीचे वळ मोठ्या प्रमाणात उठले आहेत. याप्रकरणी पती विनोद शिंदे याला पत्नी आणि आईला मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, अधिक तपास कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.