डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करणार्‍या तरुणाच्या हत्येचा आरपीआय आठवले गटाकडून जाहीर निषेध; उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा फलटण येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कडून जाहीर निषेध करण्यात येत आहे व या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशा मागणीचे निवेदन आरपीआयकडून फलटणच्या प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

आरपीआय (आठवले गट) ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही समाजातील जातीवाद अजून मिटलेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार्‍या तरुणाची हत्या होते, हे दुर्दैवी आहे. अशा समाजकंटकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना न्याय द्यावा.

फलटण शहर आरपीआय (आठवले गट) कडून या हत्येचा जाहीर निषेध करण्यात येत असून हत्येतील गावगुंडांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देताना आरपीआयचे सातारा जिल्हा सचिव विजय येवले, विमलताई काकडे, मधुकर काकडे, मीना काकडे, मुन्ना शेख, अलका बनसोडे, संजय निकाळजे, राखी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!