डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात जागोजागी शुभेच्छा फलक लावून महामानवाला केले अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२३ | सातारा |
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणी व संघर्षाने अनेकांना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर काहींनी जागोजागी हार्दिक शुभेच्छा फलक लावून तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची सुरुवात करून महामानवाला अभिवादन केले आहे.

सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजधानी होती. आज ही क्रांतिकारक विचार जोपासले जात आहेत. दि. ७ नोव्हेबर १८९६ रोजी बाल भीमाने म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील तत्कालीन सातारा हायस्कूलमध्ये शाळा प्रवेश केला होता. तसेच अनेकदा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी भेट दिली आहे. शेड्युल कॉस्ट फेडरेशन व स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून सातार्‍यात त्या काळी आमदार खंडेराव सावंत हे निवडून आले होते. त्यानंतर आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाचे एक ही नेते आमदार होऊ शकले नाही; परंतु, इतरांना आमदार करण्यासाठी काही दलित व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. आज ही इतर पक्षांच्या अजेंड्यावर काही महाभाग अद्यापही काम करीत आहेत. त्यांनी ही जागोजागी फलक लावून सहभाग नोंदवला आहे.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व खेड्यापाड्यात जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण, प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, व्याख्याने, भव्य मिरवणूक व सांस्कृतिक व सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एक महिना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सवानिमित्त समता, बंधुता, लोकशाहीचा गजर खेड्यापाड्यात केला जातो. यासाठी अनेक बांधव मोठ्या संख्येने सहकार्य करीत असतात. सामाजिक एकोपा निर्माण झाला आहे.

अलीकडच्या काळात वाढत्या प्रभावाने डिजिटल जुगलबंदीतून जागोजागी फलक, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा लावून विनम्र अभिवादन करून काहीजण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तर काही कार्यकर्ते वैचारिक बांधिलकी स्वीकारून विविध विधायक उपक्रम राबविण्यात धन्यता मानत आहेत. त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
‘या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हावे’ हे भीमगीत वाजविले जाते. पण, अनेक ठिकाणी गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे दिसून येत आहे. आज सातारा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार ठिकाणी विनम्र अभिवादन फलक लावून महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या प्रभावसुद्धा दिसून आला आहे. त्याचे मतांमध्ये रूपांतर होणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट मत दलित पँथरचे कार्यकर्ते तसेच सामान्य फुले, शाहू, आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी झटणारे जुने कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करत जगा, हा संदेश देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र दिशा दिली आहे. त्या मार्गाने आगेकूच करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने काही महत्वाच्या सामाजिक संघटना काम करीत आहेत. चांगले विचार जोपासले जात आहेत. अशा पद्धतीने होणार्‍या जयंती महोत्सवाला सुरूवात झाली असून त्यामध्ये सर्व जातीधर्मातील लोकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. हा क्रांतिकारक बदलसुद्धा पाहण्यास मिळत आहे. दिवसेंदिवस जयंती महोत्सवानिमित्त लोकांची संख्या वाढत आहे. अशावेळी काही राजकारणी मंडळीसुद्धा सहभागी होताना दिसत आहे. त्यांचेही स्वागत करण्यात येत असून काहींनी तर नेत्यांची छबी लावूनच फलकबाजी केली आहे. तो सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.


Back to top button
Don`t copy text!