दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२३ | फलटण |
सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, समाजाला समतेचा संदेश देणारे क्रांतीबा महात्मा जोतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे क्रांतिकारक पाऊल उचलत फलटणमधील सावित्रीच्या लेकींच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फलटण तालुक्यातील तमाम नागरिक उपस्थित होते.
जयंतीनिमित्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सकाळी लवकर महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन केले. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटणचे तहसिलदार समीर यादव, उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, माजी नगरसेवक सचिन बेडके, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख नानासो उर्फ पिंटू इवरे, आमिरभाई शेख, कोळकीचे उपसरपंच विकास नाळे, अमोल भोईटे, अमित भोईटे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, नंदकुमार काकडे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.
सकाळी फलटण तालुक्यातील नागरिकांनी व महिलांनी संपूर्ण शहरातून बाईक रॅली काढून ‘जय ज्योती, जय क्रांती’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी होत असल्याने तालुक्यातील अनेक गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा फुले चौकात संयोजन समितीने ‘क्रांतिसूर्य’ अशी अक्षरे लिहहलेला ‘सेल्फी पॉईंट’ तयार केला होता. या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच असंख्य नागरिकांना झाला. दिवसभर या ठिकाणी प्रचंड गर्दी होती.