डॉ. हर्ष वर्धन यांनी चौधरी ब्रह्म प्रकाश आयुर्वेद चरक संस्थान, नाझफगड येथील समर्पित कोविड-19 आरोग्य केंद्राला दिली भेट


सीबीपीएसीएसने आयुर्वेदाच्या माध्यमातून कोविड रुग्णाची काळजी घेत अनुकरणीय भूमिका साकारली आहे – डॉ. हर्ष वर्धन

स्थैर्य, नवी दिल्ली, 25 : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज चौधरी ब्रह्म प्रकाश आयुर्वेद चरक संस्थान, नाझफगड, नवी दिल्ली येथील समर्पित कोविड-19 आरोग्य केंद्राला भेट दिली.

त्यांनी यावेळी कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी या केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला. कोविड-19 आरोग्य केंद्रात असताना मंत्र्यांनी डॉक्टरांच्या गटाशी संवाद साधला आणि कोविड-19 रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. कोविड-19 आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी आणि आयुर्वेदिक औषधांद्वारे केलेल्या उपचारांच्या परिणामाबद्दल त्यांनी त्यांचा अभिप्राय घेतला.

डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्राच्या विविध सुविधांचे परीक्षण केल्यानंतर आणि संवाद साधल्यानंतर सीबीपीएसीएस डीसीएचसीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, आयुर्वेदाच्या तत्वांच्या आधारे कोविड बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी भारतातील पहिले आयुर्वेदिक रुग्णालय म्हणून कार्यरत असलेले  सीबीपीएसीएसच्या संपूर्ण चमूची भावना, उत्साह, धैर्य आणि प्रयत्न कौतुकस्पद आहेत. सीबीपीएसीएस संपूर्ण भारतात आयुर्वेदाच्या माध्यमातून कोविड रुग्णाची काळजी घेत अनुकरणीय भूमिका साकारत आहे. “येथील कोविड-19 रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद ऐकणे हे खूप आनंददायक आहे, असे आरोग्य मंत्री म्हणाले. कोविड-19 प्रतिसाद आणि व्यवस्थापनात आयुर्वेदाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सीबीपीएसीएसच्या संपूर्ण चमूच्या अथक प्रयत्नांचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे त्यांनी अभिनंदन केले.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “आयुर्वेद हे भारतातील पारंपारिक औषधीय ज्ञानाचे स्रोत असून त्यात प्रचंड क्षमता आहेत. या डीसीएचसीमधील कोविड-19 रूग्णांच्या उपचारांमध्ये समग्र चिकित्सा आणि  उपचारांमध्ये  अंगभूत सामर्थ्याचा चांगला उपयोग केला जात आहे. हे ज्ञान आणि अनुभव जगभरातील लोकांना विशेषतः कोविड-19 विरुद्धची लढाई लढताना नक्कीच फायदेशीर ठरेल.”

कोविड-19 ला भारताने दिलेल्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, “आज आपल्याकडे 422 सरकारी प्रयोगशाळा आणि 177 खाजगी प्रयोगशाळांची शृंखला आहे. दोन्हीमधील चाचणी क्षमता वृद्धिंगत झाली आहे आणि आतापर्यंत सुमारे दररोज 1,50,000 चाचण्या घेऊ शकतो. कालच आम्ही 1,10,397 चाचण्या घेतल्या आहेत. कालपर्यंत आम्ही 29,44,874 चाचण्या घेतल्या आहेत.”

देशभरातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधेविषयी माहिती देतांना ते म्हणाले की, “कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी संपूर्ण देशभरात पुरेशा प्रमाणात पायाभूत आरोग्य सेवा आणि सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यांना तीन श्रेणी मध्ये विभागण्यात आले आहे, समर्पित कोविड रुग्णालय (डीसीएच), समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि कोविड सुश्रुषा केंद्र (सीसीसी) यामध्ये पुरेशा प्रमाणात अलगीकरण बेड, आयसीयु बेड आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत.” या सुविधांच्या आकडेवारीविषयी माहिती देतांना ते म्हणाले की, “देशभरात एकूण   968 समर्पित कोविड रुग्णालये आहेत ज्यात 2,50,397 बेड (1,62,237 अलगीकरण बेड + 20,468 आयसीयू बेड); 1,76,946 बेडसह (1,20,596 अलगीकरण बेड + 10,691 आयसीयू बेड) 2,065 समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि 6,46,438 बेडच्या सुविधेसह 7,063 कोविड सुश्रुषा केंद्र कार्यरत आहेत.”

संरक्षणात्मक उपकरणांविषयी ते म्हणाले की, “देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाल्याने आता देशात पुरेशा प्रमाणत एन95 मास्क आणि पीपीई किटचे निर्माण केले जात असून राज्यांची आवश्यकता पूर्ण केली जात आहे. त्यांनी पुढे असे सांगितले की, राज्य/केंद्रशासित प्रदेश तेसच केंद्रीय संस्थांना अंदाजे 109.08 लाख एन-95 मास्क आणि सुमारे 72.8 लाख वैयक्तिक संरक्षण उपकरण (पीपीई) पुरविली आहेत.

देशातील कोविड-19 च्या नियंत्रणाच्या स्थितीबाबत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “लॉकडाऊन पूर्वी, 25 मार्च 2020 रोजी 3 दिवसांच्या कालावधीत मोजला जाणारा दुप्पट दर 3.2 होता, जेव्हा हा दर 7 दिवसांच्या कालावधीत मोजण्यात आला तेव्हा तो 3.0 होता आणि 14 दिवसांच्या कालावधीत मोजला तेव्हा 4.1 होता. आज 3 दिवसाच्या कालवधीत हा दर 13.0 आहे, 7-दिवसाच्या कालवधीत 13.1 आणि 14-दिवसांच्या कालवधीत मोजला असता हा दर 12.7आहे. त्याचप्रमाणे, मृत्यूचे प्रमाण 2.9% आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 41.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या सर्व बाबी कोविड-19 रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा प्रतिबिंबित करतात.”

आतापर्यंत सीबीपीएसीएस केंद्रामध्ये एकूण 201 रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी 37 रुग्ण बरे झाले आहेत आणि 100 रुग्णांना घरी अलगीकरण सुविधेत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 19 रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊन विशेष रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. या केंद्रात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एकूण 270 बेडच्या क्षमतेपैकी 135 बेड्स कोविड-19 रुग्णांच्या सेवेसाठी तयार केले आहेत, लक्षणरहित, सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी जारी केलल्या नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे येथे काटेकोरपणे पालन केले जाते. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर अशाप्रकारे 6 वॉर्ड मध्ये 135 बेडची सुविधा करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना यावेळी कोविड-19 रूग्णांच्या व्यवस्थापनाविषयी आणि आवश्यकतेनुसार क्षेत्रांची तपासणी व विभागणी करण्याविषयी माहिती देण्यात आली. सीबीपीएसीएसचे संचालक-प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत वरिष्ठ  प्राध्यापकांचा समावेश असलेल्या विशेष कोविड कृतिदल हे कोविड-19 रुग्णांच्या व्यवस्थापन आणि उपचाराचा आढावा घेते असे देखील त्यांना सांगण्यात आले.

सीबीपीएसीएसमध्ये आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी एक समग्र दृष्टीकोन अवलंबला जातो. आयुर्वेदिक आणि वनौषधी (हर्बल) उपचारांव्यतिरिक्त, समग्र दृष्टिकोनात योग, ध्यान, प्राणायाम इत्यादींचा समावेश आहे.

या आढावा बैठकीत डॉ आर.के. मनचंदा, संचालक (आयुष), जीएनसीटीडी, डॉ. विदुला गुर्जरवार, संचालक-प्राचार्य, सीबीपीएसीएस यांच्यासह वरिष्ठ प्राध्यापक, डॉक्टर आणि मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!