अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेच्या अनुदानात मोठी वाढ; विद्यार्थ्यांना मिळणार ८० हजारांपर्यंत मदत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारने भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणानुसार आता वर्षाला ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १५ ऑक्टोबर : राज्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि अन्य शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे वसतिगृहांतील जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शिक्षणाच्या ठिकाणानुसार मिळणार अनुदान

स्वाधार योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता अशा तीन प्रमुख बाबींसाठी सुधारित अनुदान दिले जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ८० हजार रुपये अनुदान मिळेल. इतर महसुली विभागांतील शहरांमध्ये आणि उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ६८ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५७ हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

शैक्षणिक साहित्याकरिता स्वतंत्र आर्थिक मदत

या सुधारित अनुदानाव्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरिता दरवर्षी आठ हजार रुपये स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत. तसेच अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना साहित्यासाठी चार हजार रुपयांची मदत एकरकमी देण्यात येणार आहे. इयत्ता अकरावी, बारावी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!