बंडखोरांना थारा देवू नका; अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा: श्रीमंत संजीवराजे


स्थैर्य, कोळकी दि.१० : कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्या राजे गटाने जे अधिकृत उमेदवार उभे केले आहेत त्यांच्याच पाठीशी उभे राहण्याची सर्वांनी भूमिका घ्यावी. बंडखोरांना याठिकाणी अजिबात थारा देवू नका, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील मतदारांना केले.

कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक 6 मधील अधिकृत उमेदवार तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती.

एखाद्याला संधी दिल्यावर त्याच्या पाठीशी गट, पक्ष उभा राहत असतो. मात्र अशा लोकांनी गटाच्या नेत्याचा शब्द ऐकला पाहिजे. थांबायला सांगितल्यावर थांबलं पाहिजे, पण कोळकीत अनेक जणांनी बंडखोरी करुन आपल्या नेत्याचा शब्द ऐकला नाही. त्यामुळे अशा लोकांना थांबवण्याची जबादारी आता तुमची आहे. संधी आज नाही उद्या मिळत असते. जो विश्‍वासातला असतो, जवळचा असतो तो ऐकतो. जो विश्‍वासातला नसतो, जवळचा नसतो तो ऐकत नाही हे सूत्र मतदारांनी लक्षात ठेवून बंडखोरांच्या सांगण्याला भुलू नये. गटाच्या निर्णयाबरोबर जे राहतील तेच आपले असतील. ऐकलं तर तुम्ही आमचे, नाही ऐकलं तर तुम्ही आमचे नाही, असा बंडखोरांना इशारा देवून मतदारांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करावे. जातीपातीच्या राजकारणाला आपण कधीही थारा दिलेला नाही. अशा राजकारणाला आत्ताच उपटून टाका. सभेस उपस्थितांच्या गर्दीतून निकालाची नांदी दिसून येत आहे.उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत, असेही आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!