
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारातील रासायनिक उत्पादने वापरण्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक साहित्यापासून सुगंधी उटणं तयार करून त्वचेचे आरोग्य उत्तम राखता येते.
स्थैर्य,सातारा, दि. ०७ नोव्हेंबर : दिवाळीच्या दिवसांमध्ये अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व असते. सणसमारंभाच्या काळात स्वतःचे सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. मात्र, बाजारातील रासायनिक उत्पादनांऐवजी घरगुती साहित्यापासून तयार केलेले उटणं त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते.
घरच्या घरी उटणं बनवण्याची सोपी पद्धत
उटणं तयार करण्यासाठी हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, तांदूळ, जवस, बदाम आणि कडुलिंबाची पाने मंद आचेवर वेगवेगळी भाजून घ्यावीत. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवावी आणि ती चाळून घ्यावी. त्यानंतर या पावडरमध्ये चंदन पावडर आणि आंबे हळद मिसळून सुरक्षित उटणं तयार करता येते.
अभ्यंग स्नानासाठी वापरण्याची पद्धत
स्नान करण्यापूर्वी वाटीमध्ये आवश्यकतेनुसार उटण्याची पावडर घेऊन त्यात थोडे दूध, गायीचे तूप, मध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट त्वचेवर लावून हलк्या हाताने मसाज केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हरभऱ्याची डाळ काळे डाग कमी करण्यास मदत करते, तर तांदळातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा टवटवीत राहते.





