कोरोनासंदर्भात आठवडाभराची आकडेवारी संकलीत करून जिल्ह्याची लेव्हेल निश्‍चित करणार -जिल्हाधिकारी शेखर सिंह


स्थैर्य, सातारा, दि.०९: सध्या अंशतः अनलॉक करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत शनिवार ते शुक्रवारची आकडेवारी संकलित करून जिल्ह्याची लेव्हल निश्‍चित केली जाणार आहे. त्यानुसार नियम लागू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी विनय गौडा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, अंशतः अनलॉक केले तरी व्यवसायिक, व्यापारी, कारखानदार याचबरोबर नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. परंतु, रस्त्यावर लोक गर्दी करू लागले आहेत. नियमांचा भंग केल्यास कारवाई सुरूच राहणार आहे. विनामास्क ग्राहक आढळले तर दुकानदारास 1 हजार रुपये दंड, गर्दी दिसल्यास दुकान महिनाभरासाठी सील केले जाणार आहे. लग्न कार्यक्रमात 25 पेक्षा जास्त लोक जमल्यास कटुंबाला 25 हजारांचा दंड करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर 500 रुपयांचा दंड होणार आहे. तथापि, लोकांनी कारवाईच्या भीतीपोटी नव्हे तर आपली जबाबदारी समजून कोवीडबाबतच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

जिल्हाधिकारी शेखरसिंह पुढे म्हणाले, जिल्ह्यात संकमणाची टक्केवारी सध्या 9.75 टक्के इतकी आली तरी ती पूर्णतः नैसर्गिक आहे. सर्व आरोग्य यंत्रणेकडून येणार्‍या आकडेवारीचे काटेकोर संकलन केले जात आहे. जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत दर आठवड्याला शनिवार ते शुकवार अशा आकडेवारीचे शास्त्रीय संकलन करून संक्रमणाची टक्केवारी निश्‍चित केली जाणार आहे. सातारकरांनी करोनाची तिसरी लाट उद्भवू नये याकरिता सामाईक अंतर राखणे, विनाकारण गर्दी न करणे या उपाययोजनांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

लसीकरणा संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यात 7 लाख 69 हजार 581 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून जिल्हयात एकूण 56% लसीकरण झाले आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत आदेशाप्रमाणे खाजगी दवाखान्यांमध्ये सुध्दा दीडशे रूपयांच्या नाममात्र शुल्कात लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय करोनाच्या तिसर्‍या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात आयसीयू व ऑक्सीजन बेडची क्षमता पाच हजारापर्यंत वाढविणे, जिल्ह्याची 48 मेट्रिक टन ऑक्सीजनची पूर्तता करणारे ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणे, कॉन्स्ट्रेटरचा मुबलक पुरवठा ठेवणे, इ. उपाययोजना युद्ध पातळीवर राबविले जात असून बालरोगतज्ञांच्या टास्कफोर्सच्या सूचनेप्रमाणे 0 ते 2 बालकांसाठी मास्क न वापरणे, 2 ते 5 वयोगटाच्या बालकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करणे, 5 वर्षापुढील बालकांना मास्कची सक्ती करणे ही नीती अवलंबिली जाणार आहे. त्या पध्दतीने पालकांना समुपदेशन करणार्‍या चित्रफिती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. बालकांची विशेष हॉस्पिटल्स ही अंगणवाडीच्या धर्तीवर विकसित करताना येथील वातावरण हलकेफुलके ठेवणेकरिता बालरोगतज्ञांचा विशेष सल्ला घेतला जाणार आहे.

माझे मूल माझी जबाबदारी योजनेचा शुक्रवारी शुभारंभ
करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या संक्रमणाचा लहान मुलांना त्रास होवू नये याकरिता सातारा कराड फलटण वाई या चार तालुक्यात लहान मुलांसाठी तीस ऑक्सीजन बेडची विशेष रुग्णालये उभारली जात आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माझे मूल माझी जवाबदारी या योजनेचा शुभारंभ येत्या शुक्रवारपासून नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे शेखरसिंह यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!