विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा – महेश रोकडे

बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कामापुरता करावा, त्यास विनाकारण वेळ दिल्यास जीवनातील अमूल्य वेळ वाया जाईल. त्याचप्रमाणे मदतीचे मूल्य हे गरजेवर अवलंबून असते. कठीण परिस्थितीत मदत ही महत्त्वाची असते. त्याची किंमत होऊ शकत नाही, असे प्रतिपादन बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.

बारामती तालुका मराठा सेवा संघ यांच्या वतीने ‘जिजाऊ शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत लाभार्थीं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महेश रोकडे बोलत होते.

यावेळी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे, विश्वस्त देवेंद्र शिर्के, मनोज पोतेकर, प्रदीप शिंदे, पोपटराव गवळी, दीपक बागल, व्यवस्थापक अमोल चांदगुडे, पत्रकार अनिल सावळेपाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक फिरोज मुलाणी, व्यावसायिक जमीर शेख व निरंजन पाटील आदी मान्यवर व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकता. त्यामुळे एका प्रत्यनात अपयश आले तरी वारंवार प्रयत्न करत राहावा, एक दिवस यश शोधत येणार असल्याचे महेश रोकडे यांनी सांगितले.

सर्वच क्षेत्रात स्पर्धा असताना संत तुकाराम व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास व सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळणार असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक फिरोज मुलाणी यांनी सांगितले.

वीस विद्यार्थी व विद्यार्थ्यांना पाच लाखांपर्यंतच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगून जिजाऊ करिअर सेंटरच्या कार्याची माहिती अध्यक्ष नामदेवराव तुपे यांनी दिली.

यावेळी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभव कथन करून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील केले व आभार देवेंद्र शिर्के यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!