वाढदिनीही कार्यतत्पर डॉक्टर : डॉ. प्रसाद जोशी


दि. १३ ऑक्टोबर रोजी डॉक्टर प्रसाद जोशी यांचा वाढदिवस…

खरंतर त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे, हे मला काही माहीत नव्हतं. कारण सकाळपासून व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक काही चेक केलं नव्हतं. त्या दिवशी सकाळपासूनच लचकलेली कंबर चांगलीच दुखायला लागलेली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी घरगुती सामान हलवताना दोनवेळा कंबर लचकली होती, त्यानंतर काल पुन्हा लचकली, ते तसंच अंगावर काढत बसलेलो.

काल लचकलेली कंबर आज सकाळपासून अतिशय जास्त प्रमाणात दुखायला लागली होती, त्यामुळे सकाळी काहीही न बघता थेट डॉक्टर प्रसाद जोशी यांना फोन लावला. त्यांचा वाढदिवस आहे-नाही, हे काहीच माहीत नव्हतं. बहुधा ते मीटिंगमध्ये असावेत म्हणून त्यांनी पाच मिनिटात परत फोन करतो, असे म्हणत फोन ठेवला; परंतु माझे दुखणे मला सहन होत नव्हते, त्यामुळे मी थेट दवाखान्यामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर मला कळलं की, आज डॉक्टर प्रसाद जोशी यांचा वाढदिवस आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून मी डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी कायमच त्यांच्याकडे जात आलेलो आहे; परंतु आज अचानक त्रास जास्त होऊ लागल्याने मला त्यांच्याकडे जावे लागले.

परंतु ते वाढदिवसासाठी नव्हे, तर कंबरदुखीसाठी. तिथे गेल्यानंतर काही वेळातच डॉक्टर प्रसाद जोशी आले. आल्यानंतर मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे देत असताना त्यांना कंबरदुखीबद्दल सांगितले. त्यावेळी इतरजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले, त्या सर्वांना थांबवून त्यांनी मला तपासले व तातडीने एक्स-रे काढू व आपण एकदा चेक करू, असे सांगितले. एक्स-रे काढल्यानंतर पुन्हा त्यांच्यासमोर शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आले असतानासुद्धा माझा एक्स-रे बघितला. एक्स-रे बघून त्यांचे सहकारी अझहर मुजावर यांना लगेच डॉक्टरांनी गोळ्या सांगितल्या व मला विश्रांती घेण्यासाठी सांगितले.

या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या मूळ पेशाला बाजूला न ठेवता वाढदिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांना थांबवून मला तपासले, यातच भरपूर काही गोष्टी सांगून जात आहेत. वास्तविक पाहता त्यादिवशी डॉ. जोशी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या इतर सहकारी डॉक्टरांनासुद्धा मला तपासण्यास सांगू शकत होते; परंतु त्यांनी स्वतः तपासून मला गोळ्या दिल्या.

असे विविध प्रसंग अनेकांच्या बाबतीत डॉक्टर प्रसाद जोशी यांचे घडले असतील. असे शेकडो नव्हे तर हजारो नागरिकांचे दुखणे डॉक्टर जोशी यांनी थांबवलेले असणार, यात तीळमात्र शंका नाही. डॉक्टर प्रसाद जोशी यांना दीर्घायुष लाभो व ते सातत्याने फलटणकरांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत, हीच प्रभू श्री रामचरणी प्रार्थना.

– एक परिचित


Back to top button
Don`t copy text!