प्रवचने – सत्संगतीत राहावे


नेहमी संतांची संगत करावी. परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्याजवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार ? त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात, ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषयलालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का ? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का ? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते; आणि भेट झाल्यावर, जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात.

एकजण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे, कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे, सदा मुद्रा खिन्न असे. कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्‍गुरु म्हणाले, “माझा तो वेडा कुठे आहे ? तो आज का आला नाही ?” हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला, आणि जो तिथून निघाला तो पुनः आलाच नाही ! तो कशाला येईल ? गुरूने एकदा आपल्याला ‘आपले’ म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले, आणि म्हणून त्याचे काम झाले. गुरू तुम्हाला ‘तुम्ही माझे झाला’ असे म्हणत असतानासुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता, आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. या‍उलट, गुरू तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर आज विश्वास बसायचा नाही; पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते.

मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी; त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील; ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते.

संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते


Back to top button
Don`t copy text!