दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२४ | फलटण |
‘साहित्य’ हे माणसाला सतत जागे करीत असते. साहित्याचा आपण कसा आस्वाद घेतो, यावर आपले जागेपण अवलंबून आहे. साहित्यातून समाजाच्या व्यथा, दुःख, दैन्य याच्या चित्रणाबरोबर एैयाशीपणा, बडेजाव, गरीब-श्रीमंत दरी पाहावयास मिळते. साहित्यातील शब्द मानवी मनावर खोल परिणाम करतात. शब्द कधी छोटा नसतो तर कधी मोठा नसतो. तो स्थिर असतो, वाक्यात तो कसा वापरलाय यावर त्याचा परिणाम दिसून येतो. जशी एखादी कला सामान्य माणसाला असामान्य बनविते. कला शिका अमर व्हाल. यासाठी संवाद फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. साहित्यातील संवाद दीर्घकाळ मनावर अधिराज्य गाजवतो, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले.
नाना-नानी पार्क, फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एकोणिसाव्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, रानकवी राहुल निकम, प्रा. श्रेयस कांबळे, अॅड. आकाश आढाव, सर्पमित्र मंगेश कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरेश शिंदे पुढे म्हणाले की, शब्द कधी म्हातारे होत नाहीत. सहवास अणि संवादाने मन व मत यांचे परिवर्तन होते. ज्येष्ठांचे साहित्य वाचनामुळे आम्ही घडलो व साखर शाळेची निर्मिती झाली. साहित्याने जगायला, झुंजायला व नव्याने काहीतरी वेगळे करायला शिकवले.
यावेळी राहुल निकम म्हणाले की, निसर्ग कधी राग, लोभ, मत्सर, द्वेष, मोह मनात धरत नाही. स्वतःची झीज तो स्वतः भरून काढतो. तो नेहमीच तटस्थ भूमिकेत असतो, म्हणून निसर्गावर प्रेम करा, तो भरभरून देईल. तसेच प्रतिभेला शाप असतो.
प्रा. श्रेयस कांबळे म्हणाले की, माणसाला वेदना वाचता आल्या पाहिजेत, तरच उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण होईल.
मंगेश कर्वे म्हणाले की, साहित्यिक संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून मोबाईलचा वापर अती कमी झाला असून रोज नव्याने काहीतरी वाचावे वाटते.
साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ताराचंद्र आवळे यांनी करून या महिन्याचा विषयमुक्त संवाद का निवडला, त्याचा काय परिणाम होईल तसेच आत्मचरित्र कमी वयात लिहिण्याचे फायदे तोटे सांगून उत्तम चरित्र कसे, केव्हा व का लिहावे, यावर भाष्य केले.
सूत्रसंचालन व आभार अॅड. आकाश आढाव यांनी मानले. यावेळी फलटण परिसरातील साहित्यप्रेमी, साहित्य रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.