
फलटणमध्ये वर्षावास अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म आणि लोकशाही विचारांवर विशेष धम्मसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडियाच्या वतीने वर्षावास-२०२६ धम्मसंकल्प अभियानांतर्गत विशेष धम्मसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आडरगाव येथील पंचशील बुद्धविहार येथे होणार आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ हा या धम्मसंवादाचा मुख्य विषय आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
भारतीय बौद्ध महासभा, आडरगाव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आर.पी.आय. (आठवले) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, भंते नागप्रकाश, भंते धम्मानंद, प्रा. विनोद बागडे, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे संचालक सचिन मून आणि दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश कदम असून सूत्रसंचालन सतिश काकडे करणार आहेत.
लोकशाही मूल्यांवर मंथन आणि उपस्थितीचे आवाहन
या धम्मसंवादातून बौद्ध धम्मातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि लोकशाही मूल्यांच्या परस्परसंबंधांवर विचारमंथन होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील बौद्ध उपासक-उपासिका, धम्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा आणि भीमगौरव तरुण मंडळ आरडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
