समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांचे स्मरण; फलटणमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आत्मसन्मानाच्या विचारांचे स्मरण करत फलटण तालुक्यातील समता नगर (विडणी) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील समता नगर (विडणी) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमीनिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय सामाजिक इतिहासात नवा अध्याय निर्माण केला, याचे महत्त्व याप्रसंगी विशद करण्यात आले.

महामानवांचे महान योगदान

यावेळी मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा बौद्धाचार्य बाबासाहेब जगताप यांनी सांगितले की, आज आपण ज्या सन्मानाने आणि अभिमानाने समाजात वावरतो, विविध पदांवर जातो आणि हक्क बजावतो, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान योगदान आहे. त्यांनी आपल्याला केवळ धम्माची ओळख दिली नाही, तर माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान मिळवून दिला आहे. हा दिवस घराघरांमध्ये साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

धम्माचे आचरण हीच खरी आदरांजली

भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हा दिवस केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून न साजरा करता डॉ. आंबेडकरांच्या धम्मविचारांचे स्मरण, आत्मपरीक्षण आणि आचरणाचा दिवस म्हणून पाळला पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बुद्धवंदना करावी, त्रिशरण-पंचशीलाचे पठण करावे आणि मैत्री, करुणा, समता वाढविण्याचा संकल्प करावा.

मंगलमय वातावरण आणि सहभोजन

या निमित्ताने समता नगर परिसरात सकाळपासूनच बुद्धवंदना, बुद्धपूजा आणि महामानवांच्या प्रतिमांना अभिवादनामुळे मंगलमय व उत्साही वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही मोरे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी आणि आनंदाची देवाणघेवाण करत उपस्थितांनी हा दिवस आनंदात साजरा केला. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!