सर्वसाधारण सभेविना फलटणच्या विकासाला खीळ ?


निदान कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तरी मीटिंग बोलवा


स्थैर्य, फलटण : मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. फलटण शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी पालिका प्रशासन गत 6 महिन्यांपासून व्यस्त आहे. मात्र या दरम्यना फलटण नगरपालिकेची एकही मासिक सर्वसाधारण सभा न झाल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. शिवाय दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना निदान कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तरी नगरपालिकेची सभा होणे अपेक्षित होते, असा सूर नगरसेवकांसह नागरिकांमधून उमटत आहे.

फलटण नगरपालिकेची शेवटची मासिक सर्वसाधारण सभा मार्च महिन्यात झालेली होती. नगराध्यक्षांनी दरमहा मासिक सर्वसाधारण सभा बोलावणे हे बंधनकारक असते. मात्र कोरोनामुळे या सभेचे आयोजन करता आले नाही. शिवाय याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नव्हते. परंतु नगरविकास विभागाकडून पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतच्या सूचना आता आलेल्या आहेत व त्याबाबतचे प्रशिक्षणही पालिकेच्या नगरसेवकांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेवून आपापल्या प्रभागातील प्रश्‍न सोडवण्यासाठी निदान आता ऑनलाईन सभा तरी त्वरीत घ्या, असा सूर नगरसेवकांमधून उमटत आहे.

नगर परिषदेच्या मालकीची अ‍ॅम्बुलन्स व शववाहिका घेण्याबाबतच्या प्रस्तावावर मासिक सर्वसाधारण सभेची मोहर उमटल्याशिवाय पुढे कार्यवाही करता येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये अ‍ॅम्बुलन्स ही अतिअत्यावश्यक सुविधा आहे. तसेच कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या कोरोना योद्ध्यांच्या प्रोत्साहनपर भत्त्याच्या प्रस्ताव मंजूरीसाठीही मासिक सभेची आवश्यकता आहे. असे एक ना अनेक विषय प्रलंबित राहिल्याने फलटणकरांची हेळसांड होऊ नये याची जबाबदारी नगराध्यक्षांनी घेऊन मासिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्वरित बोलवणे गरजेचे आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन म्हणजेच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे लवकरच मिटिंग आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाईन मिटिंग बाबत सर्व नगरसेवकांना त्याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलेले आहे व एक डेमो मिटिंग सुद्धा पार पडलेली आहे.

– सौ. नीता मिलिंद नेवसे,

नगराध्यक्षा, फलटण नगर परिषद.

मासिक सर्वसाधारण सभा बोलावण्याचा अधिकार नगराध्यक्षांचा आहे. शासनाच्या नियमानुसार दर महा मासिक सर्वसाधारण सभा बोलावणे हे गरजेचे असते. परंतु कोरोनामुळे गत काही महिने सभा बोलवता आली नाही. तीन आठवड्यांपूर्वी नगर विकास विभागाने मासिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार लवकरच सभा आयोजित केली जाईल.

– प्रसाद काटकर,

मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद

फलटण शहरामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गत सहा महिन्यांमध्ये सत्ताधारी व प्रशाशनाने कोरोनाबाबत नक्की कोणत्या उपाययोजना केल्या व कोणत्या करणे गरजेचे आहे याबाबत नगरसेवकांना विश्‍वासात घेतलेले नाही. फलटणच्या जनतेने सामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ज्या नगरसेवकांना निवडून दिलेले आहे त्यांचाच आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. सत्ताधार्‍यांच्या अंतर्गत कलहामुळे शहरातील विविध विकासकामे प्रलंबित आहेत.

– समशेरसिंह नाईक निंबाळकर,

विरोधी पक्ष नेते, फलटण नगर परिषद.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!