स्थैर्य, फलटण दि.१२: कोळकी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली कोळकीचा विकास प्रगतीपथावर आहे. कोळकी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपातळीवर प्रयत्न करुन त्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील, असा विश्वास पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजे गटाने कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात आजवर अनेक विकासकामे राबवली आहेत. जनगणनेतील आकडेवारीनुसार जरी कोळकीची लोकसंख्या आठ हजार असली तरी वास्तविक कोळकीत त्यापेक्षा अधिक लोक वास्तव्यास आहेत. या सर्व ग्रामस्थांना उत्तमोत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात कोळकी ग्रामपंचायतीला यश आले आहे. इथूनपुढील काळातही ना.श्रीमंत रामराजे, आ.दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे गट विकासकामात कमी पडणार नाही, असेही सचिन रणवरे यांनी स्पष्ट केले.