स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापण्यास सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी फिनलंडमधील विद्यापीठांना सहकार्य करण्यासंदर्भात सकारात्मकपणे पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे फिनलंड येथील ‘एलयूटी’ आणि लॅब विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘एलयूटी’ विद्यापीठाच्या अध्यक्ष टेरेसा केम्पी वस्मा, लॅब विद्यापीठाचे अध्यक्ष टुरो किल्पाईनेन, टुलटेकचे अध्यक्ष अतुल खन्ना, संचालक डॉ. रवींद्र मनियार, ‘केपीएमजी’चे आशीष माहेश्वरी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देश आज वेगाने प्रगती करतो आहे. जगात सर्वात मोठी युवाशक्ती भारतात आहे. शिक्षण पद्धती वैश्विक बनत आहे. शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रात देशात आणि राज्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. स्वायत्त विद्यापीठे यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरु शकेल. या पार्श्वभूमीवर फिनलंडमधील विद्यापीठांना महाराष्ट्रात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘एलयूटी’ विद्यापीठाच्या अध्यक्ष टेरेसा केम्पी वस्मा आणि लॅब विद्यापीठाचे अध्यक्ष टुरो किल्पाईनेन यांनी महाराष्ट्रात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. फिनलंडमधील शिक्षण व्यवस्थेबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

फिनलंडमधील विद्यापीठांनी राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याच्या उपयुक्ततेबाबत माहिती टुलटेकचे अध्यक्ष अतुल खन्ना यांनी विषद केली.

फिनलंडची वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण व्यवस्था

फिनलंडमधील शिक्षण व्यवस्था जगातली सर्वांत चांगली मानली जाते. फिनलंड शंभर टक्के साक्षर देश आहे. फिनलंडमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आणि अनिवार्यसुद्धा आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांचा सर्व खर्च सरकार उचलते. शाळांमध्ये आणि शिक्षणात ज्ञान आणि इतरांशी सहकार्याची भावना या गोष्टींवर विशेष भर दिला जातो.

फिनलंडची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला सतत प्रोत्साहन देते. मुलांचे मानसशास्त्रीय समुपदेशन केले जाते. वैयक्तिक मार्गदर्शनावर भर असतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!