दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षांतील कृषी कन्यांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकर्यांना भाजीपाला जास्त काळ टिकवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शीत कक्ष कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
शून्य उर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणार्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा व फळभाज्यांचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी करता येतो. त्यामुळे फळे जास्त काळ टिकतात व त्यांची नासाडी टाळता येते. शीतगृहाची उभारणी अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकर्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शीत कक्ष उभारणे फायद्याचे ठरते. हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, शिवांजली धुमाळ, समृद्धी कुंजीर, समृद्धी उल्हारे, पूजा मारवाडी यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा.नितिशा पंडित तसेच प्रा.रश्मी नायकवडी यांचे मार्गदर्शन लाभले.