गुरांच्या चार्‍यावर युरिया प्रक्रियेचेे कृषिदूतांद्वारे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२४ | माणगाव |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निसर्गमित्र गटाने ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत रायगड, जि. माणगाव तालुक्यातील कोशिंबळे गावात गुरांच्या चार्‍यावर युरियाची प्रक्रिया कशा पद्धतीने करायची याचे प्रात्यक्षिक गावातील प्रगतिशील शेतकरी श्री. तुकाराम बक्कम यांच्या गोठ्यात केले. यावेळी चारा कशा पद्धतीने बनवायचा हेही प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले.

शक्यतो युरियाचा वापर चार्‍यातील प्रथिने वाढवण्यासाठी होतो. युरियाचे प्रमाण प्रती ५० किलो सुक्या चार्‍याला १.५ किलो युरिया वापरतात. प्रथमतः युरिया आणि पाण्याचा वापर करून द्रावण (२० लिटर) बनवावे, यानंतर जमिनीवर प्लास्टिक पेपर अंथरावा. त्यानंतर त्यावर सुक्या चार्‍याचा एक थर लावावा, त्यावर युरियाची फवारणी करावी, त्यानंतर दुसरा थर नंतर युरिया अशा प्रकारे पूर्ण चारा एकावर एक टाकावा. शेवटी संपूर्ण चार्‍यावर प्लास्टिक पेपरने वार्‍याचा संपर्क होऊ नये म्हणून संपूर्णपणे झाकावा. हे पूर्णपणे तयार होण्यासाठी २१ दिवस लागतात.

या प्रात्यक्षिकाला शेतकर्‍यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी कृषी विज्ञान केंद्र, किल्ला रोहाचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर सर, विषयतज्ज्ञ डॉ. प्रसादे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या प्रात्यक्षिकाचे आयोजन जीवन गोडसे, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, आकाश जाधव, अनिश जगताप, सुमेध वाकळे, रिषभ मोरे यांनी केले होते.


Back to top button
Don`t copy text!