दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । फलटण । राज्याचे उपमुखमुख्यमंत्री व आमचे नेते ना. अजितदादा पवार यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामासाठी नुकताच सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर फलटण नगरपरिषद हद्दीतील ज्या विकासकामांना मंजुरी होती परंतु त्यावर मागील सरकारने स्थगिती दिली होती अश्या सर्व विकासकामांना विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून स्थगिती काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी घेतला आहे. फलटण नगरपरिषद हद्दीतील सुमारे २० कोटींच्या हुन अधिक कामांच्यावरील स्थगिती उठवण्यात आली असल्याची माहिती फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन (भैय्या) भोसले, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, अजय माळवे, दादासाहेब चोरमले, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे संस्थापक राहुल निंबाळकर, अमित भोईटे, सनी शिंदे, भाऊसो कापसे, प्रीतसिंह खानविलकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले कि, मागील सरकारच्या काळामध्ये फलटण शहरासह तालुक्यातील विविध विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरासह तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासोबाबतच पूर्वीच्या सरकारने घातलेली स्थगिती सुद्धा आता उठवण्यात येत आहे. आगामी काळामध्ये फलटण शहरासह तालुक्यामध्ये जी जी विकासकामे रखडलेली होती; ती आता रखडणार नाहीत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात गेल्या ३० वर्षांमध्ये फलटणचा चेहरा मोहर बदलण्यामध्ये नक्कीच यश आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपले सरकार नव्हते तेंव्हा ज्या ज्या विकासकामांना मंजुरी मिळाली नाही व मंजूर असलेली विकासकामांना स्थगिती मिळाली होती अशी सर्व विकासकामे आगामी काही दिवसातच मार्गी लागणार आहेत. आता आगामी काळामध्ये फलटण शहरासाठी भरघोस असा निधी मिळावा असा प्रस्ताव दाखल केला आहे; त्याला सुद्धा नक्कीच मंजुरी मिळेल; असा विश्वास आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
फलटण शहरासह फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भरघोस असा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी मानले.