
थेट WhatsApp वर मिळवा
पॅकेटबंद पदार्थांमध्ये साखर, मीठ किंवा फॅट जास्त असल्यास त्यावर स्पष्ट षटकोनी इशारा छापण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एफएसएसएआयला दिले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. २७ नोव्हेंबर : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण अधिक असल्यास ग्राहकांना स्पष्ट इशारा देणारी चिन्हे छापण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला म्हणजेच एफएसएसएआयला दिले आहेत. या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
षटकोनाचे स्वरूप आणि आकार कसा असावा
अनेक कंपन्या उत्पादनांचे फायदे मोठ्या अक्षरात छापतात, मात्र साखर, मीठ किंवा फॅटची माहिती लहान अक्षरांत देतात. ही बाब लक्षात घेऊन वेफर्स, बिस्किटे किंवा इतर पॅकेटबंद पदार्थांमध्ये प्रमाण जास्त असल्यास मुख्य दर्शनी भागावर षटकोन छापावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा षटकोन पॅकेटच्या मुख्य भागातील ४ ते ५ टक्के जागा व्यापेल इतका असावा आणि त्यातील मजकूर ग्राहकांना सहज वाचता येईल अशा स्पष्ट अक्षरांत असावा.
कमाल मर्यादा निश्चित करण्याचे आदेश
पदार्थांतील मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटची कमाल मर्यादा निश्चित करणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने नमूद केले आहे. इशारा देण्याची मर्यादा खूप कमी किंवा खूप जास्त असू नये, जेणेकरून आरोग्यास हानी पोहोचणारे प्रमाण नजरेआड होणार नाही. ३५ अँड अवर हेल्थ सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले असून, यापूर्वीही अंमलबजावणीतील दिरंगाईवरून एफएसएसएआयला इशारा देण्यात आला होता.



