
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण दुष्काळ आढावा बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कर्जवसुली व वनविभागाच्या कामांवर, तर सचिन पाटील यांनी पाणी व चाऱ्यावर सूचना दिल्या.
स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सर्वंकष नियोजन करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी दिल्या. फलटण तहसील कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव यांसह तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कालवा आवर्तन आणि पाणीपुरवठा नियोजन
या बैठकीत प्रामुख्याने नीरा उजवा कालवा तसेच धोम-बलकवडी कालव्याच्या आवर्तनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कालव्याचे आवर्तन सुरू असताना दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक गावाला न्याय मिळेल, अशा पद्धतीने आवर्तनाचे व्यवस्थापन करावे, अशा स्पष्ट सूचना सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता विहिरींचे अधिग्रहण, खासगी बोअरवेल अधिग्रहण, टँकरची उपलब्धता, तसेच आवश्यकतेनुसार नवीन विहिरी व बोअरवेल घेण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व पर्यायी व्यवस्था आधीच तयार ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
जलजीवन मिशन टाक्या व टँकर फीडिंग पॉइंट
जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांच्या स्टोरेज टाक्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात याव्यात. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवण टाक्यांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ठिकाणी टँकर फीडिंग पॉइंट विकसित करावेत, असे निर्देश सचिन पाटील यांनी दिले.
दुष्काळी परिस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकसंघपणे, परस्पर समन्वय राखून आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून दीर्घकालीन नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पशुधन आणि चारा उपलब्धतेचे नियोजन
बैठकीत कृषी विभागाकडून तालुक्यातील ओला व सुका चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी सध्या सिंचनाची सुविधा असलेल्या शेतजमिनींमध्ये चारा पिकांची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यातील पशुधनाची सविस्तर माहिती घेण्यात आली. भविष्यात चाऱ्याची कमतरता भासणार नाही, यासाठी आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, असे निर्देश देण्यात आले.
जलसंधारण आणि वनविभागाची कामे
लघुपाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाझर तलाव व बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाळ काढणे, गाळमुक्त शिवार अभियान तसेच नाला खोलीकरणाच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग होण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
वनविभागाच्या अखत्यारीतील बंधारे व गाळ उपसा कामांचाही आढावा घेण्यात आला. वनविभागाच्या मालकीच्या डोंगर व जमिनींवर चेन बंधारे बांधण्यासाठी योग्य नियोजन करून ही कामे मार्गी लावावीत, अशा सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कर्जवसुली न करण्याच्या सूचना
संभाव्य दुष्काळ व टंचाईच्या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये, अशा आदेशवजा सूचना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सहकारी बँकांशी संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.
संपर्काचे आवाहन आणि धीराची ग्वाही
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले की, संभाव्य दुष्काळी परिस्थितीत कोणत्याही गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना अथवा समाजातील कोणत्याही घटकाला पाणी, चारा किंवा इतर कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने आमच्याशी संपर्क साधावा. संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता धीराने परिस्थितीचा सामना करावा. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करणे शक्य आहे. त्यामुळे कोणीही धीर सोडू नये. सर्वजण एकजुटीने आणि समन्वयाने काम करून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करू, अशी ग्वाही सचिन पाटील यांनी यावेळी दिली. या आढावा बैठकीत पाणीपुरवठा, सिंचन, पशुधन, चारा उपलब्धता, जलसंधारण, वनविभागाची कामे आणि आर्थिक उपाययोजना अशा सर्व महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांच्या समन्वयातून सज्ज राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



