
थेट WhatsApp वर मिळवा
दुष्काळी मदतीच्या दरात वाढ करण्यासह सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
स्थैर्य, सातारा, दि. २७ नोव्हेंबर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मदतीच्या रकमेत वाढ केल्याचे स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आली असून, ई-केवायसी व फार्मर आयडीमुळे अद्याप वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याकडे लक्ष दिले जात आहे. दरम्यान, दुष्काळी मदतीचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याने शेतकऱ्यांना अधिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेक्टरी मदतीत वाढ; वार्षिक पिकांसाठी ३० हजारांपर्यंत तरतूद
एनडीआरएफच्या माध्यमातून दिली जाणारी मदतीची रक्कम वाढवण्यात आली असून, पूर्वी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर दिली जाणारी मदत आता ११ हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आली आहे. याशिवाय १७ हजार रुपये मदतीची रक्कम वाढवून २२ हजार रुपये करण्यात आली असून, वार्षिक पिकांसाठी २२ हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राची वाट न पाहता टप्प्याटप्प्याने मदत देणार
सुधारित अहवालानुसार कृषी विभागासाठी १५ ते १६ हजार कोटी रुपये आणि इतर विभागांसाठी ३६ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, निधीची वाट न पाहता राज्य सरकार विविध माध्यमांतून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देईल, असे भरणे यांनी सांगितले.



